सभेचा वृत्तांत ऑगस्ट - २०२६
व्दितीय वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस.
दिनांक ०३/०८/२०२६
प्रति,
मा. सभासद,
ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सेक्टर-१५, वाशी, नवी मुंबई.
महोदय / महोदया,
सर्व सभासदांना कळविण्यात येते की, ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. भुखंड क्र. ५३, सेक्टर- १५, वाशी ची व्दितीय वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २३/०८/२०२६ रोजी सायंकाळी ०५:३० वाजता गुजरात भवन, मिनी हॉल, ३ रा मजला, सेक्टर-१५ओ, वाशी, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
तरी सर्व सभासदांनी सभेला वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.
गणसंख्ये अभावी सभा तहकुब करावी लागल्यास त्याच ठिकाणी अर्ध्या तासाने सभा घेण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
विषय सूची (Agenda)
१. सभेच्या अध्यक्ष पदाची निवड करणे.
२. मागील प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तांत वाचन व त्यास मंजुरी देणे.
३. दिनांक ०१/०४/२०२५ ते ३१/०३/२०२६ या आर्थिक वर्षाचा सोसायटीचा जमाखर्च, ताळेबंद व हिशेब तपासणीसच्या अहवालावर चर्चा करणे व त्यास मंजुरी देणे.
४. सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाकरीता हिशेब तपासणीसची (ऑडीटर) नेमणूक करणे.
५. विकासक पुनर्विकास संदर्भात स्क्रिनवर प्रकल्प सादरीकरण (Presentation) दाखविणार आहेत. त्यावर चर्चा, विचार विनिमय करुन पुढील कार्यवाहीसाठी प्लॅनला मंजुरी देणे.
६. मा. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेस येणाऱ्या विषयावर चर्चा करणे व त्यास मंजुरी देणे.
महत्वाच्या सूचना :
१. ज्या सभासदाना सोसायटीचा २०२५-२०२६ चा जमाखर्च बघायचा आहे. त्यांनी दिनांक १९/०८/२०२६ पर्यंत सोसायटीला लेखी कळवावे. आलेल्या सुचनाला अनुसरुन दिनांक २१/०८/२०२६ रोजी सोसायटीच्या कार्यालयात आवश्यक माहिती दाखविण्यात येईल. दिलेल्या मुदतीनंतर आयत्यावेळी कोणत्याही तक्रारीचा/अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
२. ज्या सभासदांच्या घरात भाडेकरु राहत आहेत त्या भाडेकरूंनी सदर सभेची नोटीस घरमालकांना पोहच करणे ही भाडेकरुची जबाबदारी राहील, असे सभासदांनी भाडेकरुस त्याबाबत सूचना दयावी.
३. सभेस सर्व सभासदांनी उपस्थित राहणे बंधनकारक व आवश्यक आहे.
४. सभेस फक्त घरमालक किंवा सहयोगी सभासद यापैकी एकालाच सभेस उपस्थित राहता येईल याची कृपया नोंद घ्यावी.
टिप : उपस्थित सभासदांना सभा संपल्यानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
End of Notice
📝 दिनांक २३/०८/२०२६ रोजीच्या व्दितीय वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त.
ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. या संस्थेची व्दितीय वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २३/०८/२०२६ रोजी सायंकाळी ठिक ०५:३० वाजता गुजरात भवन, मिनी हॉल, ३ रा मजला, सेक्टर-१५ए, वाशी, नवी मुंबई येथे आयोजन करण्यात आली असल्याबाबत सर्व सभासदांना जावक क्र. ओमकार/२०२६/वासस /१२४, दिनांक ०३/०८/२०२६ च्या नोटीसीव्दारे कळविण्यात आले होते. तसेच संस्थेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व वेबसाईटवरही सदरची नोटीस सभासदांच्या माहिती करीता टाकण्यात आली होती. त्यानुसार आज रविवार दिनांक २३/०८/२०२६ रोजी संध्याकाळी ०५:३० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती परंतु गणसंख्या पुर्ण न होऊ शकल्याने सभा अर्ध्या तासासाठी तहकुब करण्यात आली. अर्ध्या तासानंतर ठिक ०६:०० वाजता त्याच ठिकाणी सभेचे कामकाज चालु करण्यात येईल असे सचिव संदेश रेणोसे यांनी सांगितले. सभेला प्रत्यक्ष ११३ सभासद हजर होते.
वरील प्रमाणे सभासद हजर झाल्यानंतर सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली. श्री. सुरेंद्रनाथ बापर्डेकर यांनी सर्व हजर सभासदांचे स्वागत केले व विषय सूचीनूसार सभेला सुरुवात करण्यात आली.
विषय क्र. ०१ :- सभेच्या अध्यक्ष पदाची निवड करणे.
श्री. बबन साळुंखे, इमारत क्र. बी-१०-१७-०:४ यांनी अध्यक्ष पदासाठी विद्यमान अध्यक्ष श्री. विश्वास बा. मोरे यांचे नाव सुचविले त्यास श्री. सिध्दप्पा उमदीकर इमारत क्र. बी-१०-२०-०:४ यांनी अनुमोदन दिले.
श्री. विश्वास मोरे यांनी अध्यक्ष स्थान स्विकारल्याचे सभेसमोर जाहिर केले व आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा अजेंडा सभेसमोर वाचून दाखविला.
विषय क्र. ०२ :- मागील प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तांत वाचन व त्यास मंजुरी देणे.
मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविण्यापूर्वी श्री. बापर्डेकर यांनी सोसायटीमधील मयत झालेल्या १) श्री. महेंद्र वंडेकर यांची आई श्रीमती सखुबाई पांडूरंग वंडेकर, २) पी.टी. जॉन्सन, ३) श्री. हेमंत पवार यांची आई श्रीमती भिकाबाई सयाजी पवार व ४) श्री. अशोक सांळुखे, ५) श्री. अशोक गुरव यांची आई श्रीमती मंजुळ्ठा पांडूरंग गुरव हया आपल्या परिवारातील व्यक्तीचे निधन झाले असल्याने त्याना २ मिनित उभे राहून श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. त्यानंतर मागील सभेचा इतिवृत्तांत सभेपुढे वाचून दाखविला व तो सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला. काही शंका, दुरुस्ती असल्यास त्या निदर्शनास आणून द्यावेत असे सभेला सांगण्यात आले. मात्र सभासदांकडून काहीच आक्षेप नसल्याने इतिवृत्त मंजुर करण्यात आले.
ठराव सर्वानुमते मंजुर
सूचक :- श्री. सुरेंद्रनाथ बापर्डेकर
अनुमोदक :- श्री. वसंत जोशी
विषय क्र. ०३ :- दिनांक ०१/०४/२०२५ ते ३१/०३/२०२६ या आर्थिक वर्षाचा जमाखर्च, ताळेबंद व हिशेब तपासणीसच्या अहवालावर चर्चा करणे व त्यास मंजूरी देणे.
सदरचा विषय चर्चेकरीता ठेवला असता अध्यक्ष श्री. मोरे यांनी खुलासा केला की, सभेच्या नोटीसीत ज्या सभासदाना सोसायटीचा जमाखर्च, ताळेबंद, बघायचा आहे किंवा त्यांना सूचना करावयाच्या आहेत त्यांनी दिनांक १९/०८/२०२६ रोजी पर्यत सोसायटीला लेखी कळवावे. त्यानुसार श्री. ज्योतीराम काटकर यांनी लेखी सूचना केल्या होत्या. तसेच श्री. संजय शिर्के यांनी मेल करुन काही बाबींचा खुलासा विचारला होता. त्यावर दोघानाही ऑफिसमध्ये येऊन मागितलेली माहिती बघावी असे सुचविले होते. परंतु दोघेही ऑफिसमध्ये आले नाहीत. तथापि श्री. काटकर यांनी जमाखर्च मध्ये रुपये ८९०००/- केलेला खर्च विचारला असता श्री. राणे लेखाकार यांनी खर्चाबाबतचा खुलासा केला. त्यावर श्री. काटकर यांनी सदर रकमेवर टी.डी.एस. भरणा का केला नाही अशी विचारणा केली. त्यावर श्री. राणे यानी खुलासा केला की, रुपये ३००००/- पेक्षा जास्त रक्कम असेल तर टॅक्स पे करावा लागतो. रिझर्व फंडाची तरतुद का केली नाही. असा प्रश्न श्री. काटकर यानी केला असता, रिझर्व फंड व सिकिंग फंडाची तरतुद बायलॉजमध्ये नाही असा खुलासा श्री. राणे यानी केला. एक करोड बाबत विचारणा केली असता ई.एम.डी. करीता प्राप्त झालेले एक करोड रुपयांची राष्ट्रीयकृत बॅकेत एफ.डी. केली आहे असे श्री. संजय अडसुळे यांनी सांगितले ए.बी.सी. व ओ फार्मची पूर्तता करण्यात आली आहे असे श्री. अडसूळे यांनी सांगितले.
श्री. संजय शिर्के यांनी विचारणा केली की, Income & Expenditure रिपोर्ट सर्व सभासदाना पोहचला का? संपुर्ण ऑडीट रिपोर्ट सर्व सभासदांना का दिला नाही. त्यावर श्री. राणे यानी रिपोर्टचे विश्लेषण केले. सभेच्या नोटीसी सोबत जमाखर्चाची आवश्यक ती माहिती प्रत्येक सभासदांच्या घरी देण्यात आली आहे असा खुलासा मा. अध्यक्ष यांनी केला. त्यानंतर श्री. शिर्के यांनी रुपये ८९३७५/- खर्चाचे विवरण केले तर बरे होईल असे सूचविले त्यावर श्री. राणे यांनी सूचित केले की, सदर खर्च टेंडर प्रोसेसचा आहे. टेंडरला फक्त रुपये ८०००/- खर्च केलेले आहे. सोसायनी लिजडिड रजिस्ट्रेशन व इतर बाबींचा त्यामध्ये समावेश असल्याचा सविस्तर खुलासा केला.
श्री. शिर्के यांना हिशेबाचे विवरण काय पाहिजे याची विचारणा ऑफिसमध्ये येऊन करावी. उपविधी मधील तरतुदीनुसार कागदपत्रांत्री तपासणी करावी त्यानंतर आवश्यक असलेल्या कागदपत्राचे नियमानुसार शुल्क भरुन त्यांना कागदपत्रांच्या प्रती देण्यात येतील असे मा. अध्यक्ष यांनी सूचविले.
श्री. योगेश निर्मळ यांनी प्रोफेशनल चार्जेस म्हणजे काय याचा खुलासा मागितला असता श्री. राणे यांनी पुन्हा रक्कम रुपये ८९३७५/- कशी खर्च करण्यात आली याचा सविस्तर खुलासा केला.
वरील प्रमाणे चर्चा झाल्यानंतर सदरचा विषय मंजुरी करीता ठेवण्यात आला असता उपस्थित सभासदांनी हात उंचावून ठरावास मंजुरी दिली.
ठराव सर्वानुमते मंजुर
सूचक :- श्री. संजय अडसुळे
अनुमोदक :- श्री. महेंद्र वंडेकर
विषय क्र. ०४ :- सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षाकरीता हिशेब तपाणीसची (ऑडीटर) नेमणूक करणे.
सदरचा विषय चर्चेकरीता आला असता मा. अध्यक्षांनी सभेला सांगितले की, मागील दोन वर्षे बी.एच.पटेल, अॅड. असोसिएट हे ऑडीटचे काम करतात सभासदापैकी कोणाचे सी.ए. माहितीचे असतील तर नाव सुचवावे अशी विचारणा केली. ऑडीटरची नेमणूक करण्याचा अधिकार मॅनेजींग कमिटीला नाही. ऑडीटर नेमणूकीचे अधिकार जनरल बॉडीला आहेत किंवा रजिस्ार ऑफिसला आहेत. चर्चेअंती M/S.B.H. Patel यांची पुढील एक वर्षासाठी नेमणूक करावी असा सभेने सर्वानुमते निर्णय घेतला. ठराव सर्वानुमते मंजुर
सूचक :- श्री. मनोज ओव्हाळ
अनुमोदक :- श्री. प्रताप भालेराव
विषय क्र. ०५ :- मा. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळेस येणाऱ्या विषयावर चर्चा करणे व त्यास मंजुरी देणे.
विषय सूचिनुसार विषय क्र. ०५ पुनर्विकास सदंर्भात असल्याने सदरचा विषय मागे ठेवून आयत्या वेळेस येणान्या विषयावर निर्णय घेण्याचे मा. अध्यक्ष यांनी त्यांच्या अधिकारात बदल करण्याचा निर्णय घेतला व तशी सभेला विचारणा केली असता सभेने सहमती दिली.
विषय क्र. ५:१ :- इमारतीला रेलिंग बसविणे बाबत.
श्री. ढोबळे, इमारत क्र. ११ यांनी बरेच सभासद वयाची ६० वर्षे व अधिक पूर्ण केली असल्याने आवश्यक त्या इमारतीमध्ये रेलिंग बसवावे अशी मागणी केलेली आहे. या मागणी नुसार कोनेशन मागविण्यात आली असता सर्व इमारतीना रेलिंग बसविण्याचा खर्च साधारण ३ ते ३.५० लाख येणार आहे इतका मोठा खर्च करायचा का? अशी विचारणा अध्यक्षांनी सभेला केली. त्यावर श्री. बापर्डेकर यांनी सभेला सूचित केलेले की, आपले पुनर्विकासाचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. काही महिन्यानंतर इमारती पाडण्यात येणार आहेत. त्यामुळे आता एवढा खर्च करणे उचित होणार नाही. यावर सभासदांनी हात उंचावून सदरचे काम करु नये असा निर्णय घेण्यात आला.
ठराव सर्वानुमते मंजुर
सूचक :- श्री. प्रमोद वारंग
अनुमोदक :- श्री. ज्ञानेश्वर पाटील
तसचे जुलै महिन्यात पावसामुळ्ठे व वादळी वाऱ्यामुळे शांती सदन सोसायटीच्या बाजुचे झाड इमारत क्र ११ च्या बाजुला कंपाऊंड वॉलवर पडले त्यामुळे कंपाऊंड वॉलचे बरेच नुकसान झाले आहे. सदर दुरुस्तीचे काम करावे का? असा प्रस्ताव ठेवण्यात यात आला, यावर चर्चा करण्यात आली सदरचे काम करुन घ्यावे व या कामाकरीता होणाऱ्या खर्चास सभेने मंजुरी दिली.
ठराव सर्वानुमते मंजुर
सूचक :- श्रीमती स्मिता पाडावे
अनुमोदक :- सौ. अमृता पाटील
विषय क्र. ५:२ :- थकित रकमेवरील व्याज कमी करणेबाबत.
सदस्याने संस्थेच्या थकविलेल्या आकारणीवर दरसाल २१% किंवा सर्वसाधारण सभेने निश्चित केलेल्या अशा निम्नदराने सरळ व्याज देणे आवश्यक असेल असे उपविधी ७१ मध्ये तरतुद आहे. त्यानुसार सोसायटीच्या दिनांक १४/०४/२०२४ रोजीच्या सर्वसाधारण सभेत प्रत्येक महिन्याला रुपये ५००/- सेवा शुल्क व थकबाकीदार सदस्याने थकविलेल्या आकारणीवर दरसाल १५% दराने येणारे व्याज भरावे लागेल असा ठराव झालेला होता.
सूचक :- श्री. सतिश घाग अनुमोदक :- श्री. कृष्णकुमार एरोंडकर
आता शासन निर्णय दिनांक १८ जुन २०२६ मधील कलम १०६, सी-१२ मधील खर्चाची वाटणीमध्ये अनु क्र. ०६ थकीत शुल्का वरील व्याज १२% सरळ व्याजाने पेक्षा जास्त नसेल अशी तरतुद आहे. असा प्रस्ताव ठेवण्यात आला. यावर श्री. राणे यांनी सभेला सविस्तर माहिती दिली.
वरील तरतुदी नुसार थकबाकी वरील व्याज दिनांक ०१/१०/२०२६ पासूनच्या बिलावर १२% दराने आकारणी करण्यास सभेने मंजुरी दिली.
ठराव सर्वानुमते मंजुर
विषय क्र. ५:३ :- पुढील कामाकरीता वकीलाची नेमणूक करणेबाबत.
अॅड. अनिल खोपडे यांची सोसायटीचे कायदेशीर सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्याकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) नेमणूक ते विकास करारनामा (Development Agreement) पुर्ण होई पर्यत या कामकरीता नेमणूक करण्यात आली होती. आता सदरचे काम पुर्ण झाल्याने पुढील कामाकरीता नव्याने वकीलाची नेमणूक करणे आवश्यक आहे. पुढील काम PAAA चे महत्वाचे काम आहे. सदरचा करार सभासद, विकासक व सोसायटी यामध्ये होणार आहे. सदर करारात सर्व बाबींचा समावेश आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी सोसायटीचा वकील आवश्यक आहे. यावर चर्चा करण्यात आली. सभेने चर्चे अंती वकीलाची नेमणूक करणे आवश्यक असल्याचे मत झाल्याने सभेने कार्यकारी मंडतास वकील नेमणूकीस व त्याकरीता होणाऱ्या खर्चास सर्वानुमते मंजुरी दिली.
ठराव सर्वानुमते मंजुर
सूचक :- श्री. लवु भोवर
अनुमोदक :- श्री. हरिश रवारिया
विषय क्र. ५:४ :- आजच्या सभेत विषय सूचिवर नसलेला विषय
मा. अध्यक्ष यांनी PMC नेमणूक ते D.A. अॅग्रीमेंट रजिस्टर्ड होई पर्यंत वकीलाची नेमणूक करण्यात आली होती. D.A. रजिस्टर्ड झाला असल्याने पुढील कामकरीता नवीन वकीलाची नेमणूक करावी लागेल असा प्रस्ताव ठेवताना श्री. संजय शिर्के मध्येच उठून सभेला विचारले की, D.A. अॅग्रीमेंट कोणी वाचले आहे का? अशी विचारणा केली. त्यावर सभेतून कोणीही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्यानी अॅड. अनिल खोपडे यांना विचारणा केली. आजची सोसायटीची सर्वसाधारण सभा असल्याने मा. अध्यक्षांनी परवानगी दिली तर मी बोलू शकतो. अध्यक्षांनी परवानगी दिल्यानंतर अॅड. खोपडे यांनी सांगितले की D.A. बाबत सभासदांनी केलेल्या सुचनांचा विचार करण्याकरीता बऱ्याच वेळा सोसायटी कार्यालयात मिटींग घेण्यात आल्या आहेत. तसेच याच सभागृहात दिनांक ०५/०४/२०२६ रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेत सभासदांनी केलेल्या सूचना कायेदशीररित्या विचारात घेऊन ठराव एकमताने सभेने मंजुर केला आहे. तसेच अॅग्रीमेंट सही करण्याचे अधिकार त्याच सभेत अध्यक्ष, सचिव व खजिनदार यांना सभेने दिलेले आहेत. सभासदाच्या शकांना किंवा प्रश्नांना उत्तर देताना कोणत्याही सभासदाने अॅग्रीमेंट समजले नाही असे बोलणे आवश्यक होते.
अॅग्रीमेंट मराठीत का नाही असा मुद्दा उपस्थित झाला असता वकीलांनी सांगितले की, भविष्यात काही डिसपूट झाल्यास अॅग्रीमेंट इग्लिश मध्येच आवश्यक असल्याचे सभेला पटवून दिले.
त्यानंतर श्री. शिर्के म्हणाले की, मी यापुर्वी बरेच अर्ज दिलेले आहेत. त्याची उत्तरे कमिटीने दिलेली नाहीत. यावर श्री. आनंद मोरे म्हणाले की, यापूर्वी दिलेले अर्ज तुमच्या आईच्या नावाने दिलेले आहेत. तुम्ही आता सभासद झालात. त्याना कोणती माहिती आवश्यक आहे ती तपासणी करण्याकरीता उपविधी मधील तरतुदीनुसार सोसायटी कार्यालयात यावे. जी माहिती आवश्यक आहे त्याचे शुल्क भरुन आपणांस माहिती देण्यात येईल असे श्रीमती सुजाता शिर्के यांना वेळोवेळी कळविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे श्री. बी. एल माने यांना ही वेळोवेळी कळविले आहे.
मा. अध्यक्षानी नमूद केले की, डी.ए. ची प्रत प्राप्त झाल्यानंतर सभासदाकंडून दिनांक ३१/०१/२०२६ पर्यंत सूचना/हरकती मागविल्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार प्राप्त झालेल्या सूचना नुसार विकासक, पी.एम. सी. व अॅड अनिल खोपडे यांच्या सोबत मिटींग घेऊन सभासदांच्या सूचनांचा विचार करुन दिनांक ०५/०४/२०२६ रोजीच्या सभेत डी.ए. अॅग्रीमेंटला मंजुरी घेतलेली आहे. डी.ए. रजिस्टर करे पर्यत सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे.
श्री. योगेश निर्मळ यांनी मुद्दा उपस्थित केला की, डी.ए. अॅग्रीमेंटवर किती सभासदांनी सहया केल्या आहेत. त्यावर सांगण्यात आले की, १४० पर्यत सभासदांनी सहया केल्या आहेत. त्यानंतर बाकी सभासदांचे काय? अशी विचारणा श्री. निर्मळ यांनी केली. त्यावर अॅड. खोपडे म्हणाले सर्व सभासदांचे प्रतिनिधी म्हणून डी.ए. वर सही करण्याचे अधिकार १) अध्यक्ष २) सचिव ३) खजिनदार या तिघांना दिलेले असून साक्षीदार म्हणून दोन सदस्य १) श्री. प्रताप भालेराव व २) श्री. सुनिल तावडे यांना सभेने दिलेले आहे. डी. ए. सोबत सभासदांनी सहया
केलेली यादी जोडण्यात आलेली आहे. यानंतर श्री. प्रताप भालेराव यानी खुलासा केला की, १०-१५ सभासद मयत आहेत काही सभासद परदेशात आहेत. काही सभासदांना वांरवार फोन करुन देखील सहया करण्यास उपस्थित झाले नाहीत. काही सभासद ऑफिसमध्ये आले पण सही नंतर करतो असे सांगुन परत आलेच नाहीत.
अशा प्रकारे कार्यकारी मंडळाने आतापर्यत सर्व सभासद यांना विश्वासात घेऊन आता पर्यंतचे कामकाज पूर्ण केले आहे. संपुर्ण प्रक्रिया पारदर्शकतेने पारपाडलेली आहे.
विषय क्र. ५:५ :- ओमकार अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनचे जुने रेकॉर्ड नष्ट
करण्यास मंजुरी मिळणेबाबत.
ओमकार अपार्टमेंट ओनर्स असोसिएशनची स्थापना सन २९/०४/१९८२ मध्ये झालेली आहे. तेंव्हा पासूनचे जुने रेकॉर्ड ऑफिसमध्ये आहे. आता असोसिएशनचे रुपांतर सोसायटीमध्ये झालेले आहे. त्यामुळे जुने रेकॉर्ड जतन करण्याची आवश्यकता नाही. असा प्रस्ताव ठेवण्यात आला यावर सभेत चर्चा करण्यात आली. श्री. ज्योतीराम काटकर यांनी सूचित केले की, ऑडीट रिपोर्ट व सर्व सभाचे इतिवृत्त जतन करावे बाकी रेकॉर्ड (मागील ०७ वर्षापर्यत ठेवून) नष्ट करावे अशी सूचना मांडली सदर सूचना सभेने विचारात घेऊन जुने रेकॉर्ड नष्ट करण्यास सभेने मंजुरी दिली.
ठराव सर्वानुमते मंजुर
सूचक :- श्री. शिवराम धराडे अनुमोदक :- श्री. लवु भोवर
विषय क्र. ५:६ :- दिनांक २३/०८/२०२६ रोजीच्या सर्वसाधारण सभेकरीता होणाऱ्या खर्चास मंजुरी देणे.
श्री. संजय अडसूळे, खजिनदार यांनी सभेपुढे प्रस्ताव ठेवला की, आजच्या सभेकरीता हॉलचे भाडे, जेवण याकरीता अंदाजित रुपये ७०,०००/- खर्चास सभेने मंजूरी द्यावी. यावर सभासदानी चर्चेअंती संभाव्य खर्चास मंजुरी दिली.
ठराव सर्वानुमते मंजुर
सूचक :- श्री. नाथालाल गोळे
अनुमोदक :- श्री. सतिश सालियन
विषय क्र. ६ :- विकासक पुनर्विकास संदर्भात स्क्रिनवर प्रकल्प सादरीकरण
(Presentation) दाखविणार आहेत. त्यावर चर्चा, विचार विनिमय करुन पुढील कार्यवाहीसाठी प्लॅनला मंजुरी देणे.
वरील प्रमाणे विषय सूचिवरील विषस संपल्यानंतर अनु क्र. ०५ वरील विषय शेवटी घेण्यात आला. विकासक गामी ग्रुपचे संचालक व त्यांची टीम यांनी स्क्रिनवर ओमकार सोसायटीचा नियोजित प्लॅन दाखविण्यास सुरुवात केली. प्रथम संपुर्ण इमारतीचे स्ट्रक्चर दाखविले त्यानंतर ग्राऊंड प्लोअर, एनट्रन्स, लॉबी, लिप्टचा एरिया दाखविला जी + ५ माळे पार्किंग करीता असल्याचे दर्शविले ६ व्या माळयावर सर्व प्रकारच्या अॅमीनिटीज असणार ७ वा माळा ते १७ माळयापर्यत रहिवासी गाळे असणार १८ व्या माळयावर रिक्रएशन हॉल पुन्हा १९ ते ३० माळे निवासी गाळे असणार. इमारतीच्या दोन विंग अ आणि ब असणार आहेत.
रहिवाशी गाळयामध्ये ५३५, ६०१ व ६५० चौ. फुट च्या गाळयांचे डिझाईन दाखविण्यात आले. प्रात्यक्षित दाखविताना बन्याच सभासदांनी प्रश्न विचारले त्याची बिल्डरने समर्पक उत्तरे दिली. त्यामुळे सभासदांचे समाधान झाले.
शेवटी प्लॅनचा ठराव मंजुरी करीता ठेवताना सदर प्लॅनमध्ये महानगरपालिका थोडाफार बदल करु शकेल असे अध्यक्षांनी सभेला सांगितले त्यानंतर उपस्थित सर्व सभासदांनी हात उंचावून ठरावाला मंजुरी दिली.
ठराव सर्वानुमते मंजुर
सूचक :- श्री. प्रल्हाद राऊत
अनुमोदक :- श्री. अमित मेहता
वरील प्रमाणे आजच्या सभेचे कामकाज संपल्यानंतर मा. अध्यक्ष यांनी उपस्थित सभासदांचे आभार माणून सभेचे कामकाज रात्री ०८:३० वाजता संपल्याचे जाहीर केले.