सभेचा वृत्तांत, नोव्हेंबर - २०२५
विषय: दिनांक २९/११/२०२५ रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त
ओमकार सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादितची विशेष सर्वसाधारण सभा दिनांक २९/११/२०२५ रोजी संध्याकाळी ठीक ०५:०० वाजता गुजरात भवन, मिनी हॉल, तिसरा मजला, सेक्टर-१५ओ, वाशी, नवी मुंबई येथे घेण्यात येणार असल्याबाबत जावक क्र. ओमकार/२०२५/विसस/६१, दिनांक १५/११/२०२५ अन्वये सभेची नोटीस सर्व सभासदांना देण्यात आली होती. तसेच सोसायटीच्या व्हाटस्अॅप ग्रुपवर व https://omkarchsvashi.in/ या वेबसाईडवर टाकण्यात आली होती. मात्र गणसंख्या पुर्ण होऊ न शकल्याने सभा अर्ध्यातासासाठी तहकुक करण्यात आली. अर्ध्यातासानंतर ठीक ०५:३० वाजता त्याच ठिकाणी सभेचे कामकाज चालू करण्यात आले. सभेला १३४ सभासद उपस्थित होते. तसेच मे. लिलाधर परब आर्किटेक अॅण्ड डिझाईनर (PMC) व आपल्या संस्थेचे कायदेशीर सल्लागार अॅड. अनिल खोपडे उपस्थित होते.
वरील प्रमाणे सभासद हजर झाल्यानंतर सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली. श्री. सुरेंद्रनाथ बापर्डेकर यांनी सर्व हजर सभासदांचे स्वागत केले व प्रथे प्रमाणे अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव सभेपुढे ठेवला.
श्री. वसंत जोशी यांनी अध्यक्ष पदासाठी सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष श्री. विश्वास बा. मोरे यांचे नांव सुचविले. त्यास श्री. शिवराम धराडे यांनी अनुमोदन दिले.
श्री. विश्वास मोरे यांनी अध्यक्ष स्थान स्विकारल्याचे सभे समोर जाहीर केले व आजच्या विशेष सर्वसाधारण सभेचा अजेंडा सभे समोर वाचून दाखविला त्याच प्रमाणे महत्वाच्या सूचना वाचून दाखविल्या.
विषय क्र ०१:- मागील सभेचे इतिवृत्त वाचन व मंजुरी.
मागील सभेचा इतिवृत्तांत श्री. सुरेंद्रनाथ बापर्डेकर यांनी सभेपुढे वाचून दाखविला व तो सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला. काही शंका, दुरुस्ती असल्यास त्या निदर्शनास आणून द्याव्यात असे सभेला सांगण्यात आले. श्री. ज्योतीराम काटकर यांनी लेखा परिक्षण अहवालातील दोष दुरुस्ती रिपोर्ट पाठविण्यात आला आहे का? अशी विचारणा केली असता मा. अध्यक्ष यांनी दोष दुरुस्ती रिपोर्ट पाठविण्यात आला असल्याचे सांगितले.
श्री मधुकर जाधव इमारत क्र. १७ यांनी सूचना केली की, सोसायटीचा देखभाल खर्च सभासदांना जमा करण्यासाठी बँक ऑफ बरोडा मध्ये एखादे नवीन खाते उघडता येईल का? जेणे करुन सभासदांचे पैसे सस्पेन्स मध्ये पडून राहणार नाहीत. त्यावर अध्यक्षांनी सांगितले की, बरेच सभासद सोसायटीच्या बाहेर राहतात. त्यांचे भाडेकरु किंवा मुले, सुना इत्यादी ऑनलाईन पैसे जमा करतात. त्यामुळे नेमके कोणी पैसे जमा केले व कोणत्या सदनिकेकरीता याचा ताळमेळ लागत नाही. त्याकरीता मा. अध्यक्ष व लेखाकार श्री. राणे यांच्या मोबाईलवर स्क्रीन शॉट पाठवून रुम नंबर टाकण्यास सूचित केले आहे. परंतु सभासद रुम नंबर टाकत नाहीत. अशी रक्कम सस्पेन्समध्ये पडून राहते. तरी बँकेत चौकशी करुन यावर काय मार्ग काढता येईल याचा विचार करण्यात येईल.
वरील प्रमाणे शंकाचे निरसन झाल्यावर सभेने मागिल सभेच्या इतिवृत्तास मंजुरी दिली.
ठराव सर्वानुमते मंजूर
सूचक :- श्री. सुरेंद्रनाथ बापर्डेकर
अनुमोदक :- श्री. अशोक गुरव
मा. अध्यक्ष यांनी विषय पत्रिकेवरील पुढील विषय न घेता निनावी दिशाभुल करणाऱ्या खोटया तक्रारीबाबत आयत्यावेळचा विषय घेत सांगितले की, आज दिनांक २९/११/२०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता काही अज्ञात इसमानी घरोघरी सभासदांची दिशाभुल करणारे पत्रक वाटप केले आहे. त्यामध्ये सभासदांना ८०० चौ. फुट एरिया मिळेल असे नमूद केले आहे. चौकशी केली असता श्रीमती. सुजाता शिर्के यांचा मुलगा श्री. संजय शिर्के यांनी हे पत्रक वाटण्यास सांगितल्याचे कळते. सदर पत्रक वाचून दाखविण्यात आले. सभासदाना विचारणा करण्यात आली की, आपण कार्यकारी मंडळा सोबत आहात की, अशा दिशाभुल करणाऱ्या पत्रक देणाऱ्या सोबत आहात. त्यावर उपस्थित सर्व सभासदांनी हात उंचावून कार्यकारी मंडळा सोबत असून कार्यकारी मंडळाचे काम अत्यंत पारदर्शक व चांगल्या प्रकारे चालले आहे. असा कौल दिला.
विषय क्र ०२ :- पी.एम.सी. व सोसायटी समिती यांच्या संयुक्त छाननी नुसार
आणि तुलनात्मक अभ्यासानंतर दोन विकासकांकडून पुनर्विकास संदर्भात प्रकल्प सादरीकरण (Presentation) तसेच त्याबाबत चर्चा, विचार विनिमय व पुढील निर्णय घेणे.
(अ) Oakwoeds Corporation (Platinum Group)
प्रथम प्लटिनम ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित झाले होते. त्यांनी त्यांच्या कंपनीत ३ पार्टनर असल्याचे सांगितले स्क्रिनवर यापुर्वी पुर्ण केलेले प्रोजेक्ट, चालू असलेली कामे त्यामध्ये दिलेल्या सोई सुविधा, वापरण्यात आलेले मटेरिअल याबाबत माहिती दिली तसेच सोसायटी ची नवीन इमारत कशी असेल त्यामध्ये ५३५ चौ. फुट मध्ये २ बी.एच.के. कसा असेल, हॉल किचन व बेडरुम किती साईजचे असतील याचे प्रात्यक्षित दाखविले. इमारत जी+२९ माळयाची असेल त्यामध्ये मुळ रहिवाशी व सेल करीता दोन भागात विभागलेली असेल असे सांगितले. तसेच जी+५ माळयापर्यंत पार्किंग असेल व टेरेसवर खेळ, जीम, हॉल इत्यादी सुविधा देणार असल्याचे नमूद केले. त्यानंतर सभासदांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा असे सांगण्यात आले.
श्री बबन सांळुखे यांनी किचनचा दरवाजा आणि टॉयलटचा दरवाजा समोरा समोर असणार का? असे विचारले असता दरवाजे समोरासमोर येणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असे सांगितले. मटेरियल कोणते वापरणार? त्यावर आय एस ओ मार्क असलेले चांगल्या प्रतीचे मटेरियल वापरणार असे सांगितले. इतर सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
सूचक : श्री बबन सांळुखे
अनुमोदक : मनोज ओव्हाळ
(ब) Lal Gebi Infra Pvt Ltd (Gami Group)
त्यानंतर गामी ग्रुपच्या प्रतिनिधीनी स्क्रिनवर त्यांच्या कंपनीची माहिती दिली. आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेतला पुर्ण केलेले प्रोजेक्ट व चालू असलेल्या प्रोजेक्ट बाबत माहिती दिली. Redevelopment मुंबई मध्ये तीन व नेरुळ नवी मुंबई येथे एक प्रोजेक्ट केल्याचे दाखविले. सर्व प्रोजेक्ट वेळेत पुर्ण केल्याचे सांगितले. सभासदांना काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा असे सांगण्यात आले.
श्री. भालेराव यांनी १२ महिन्याचे भाडे एकदम देणार का? त्यावर त्यांनी सांगितले की, प्रत्येक महिन्याला आर.टी.जी.एस. ने सभासदांच्या खात्यात जमा करण्यात येईल. ७९ए झाल्यानंतर काम चालू करण्यास किती वेळ लागले ? डी. ए. पासून सी.सी. मिळेपर्यंत साधारण ७ ते ८ महिने वेळ जातो.
श्री. ज्योतीराम जाधव यांनी विचारले की, रेसिडेंट व सेल फ्लॅट मिक्स असणार का? त्यावर सांगण्यात आले की, विक्रीचे फ्लॅट साईज मोठी असणार त्यामुळे मिक्स करता येणार नाहीत. यानंतर इतर सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
गामी ग्रुपचे प्रतिनिधी निघून गेल्यानंतर श्री. लिलाधर परब व अॅड. अनिल खोपडे यांनी सभासदांना मार्गदशन केले. अध्यक्ष श्री. मोरे यांनी सभासदांना विनंती केली की, आपण दोन्ही विकासकांनी दाखविलेले Presentation बघीतले आहे. दोघांपैकी आपणास ७९ए च्या प्रोसेस करीता एकाची निवड करायची आहे. त्या करीता सर्व सभासदांना संमती पत्राचा फॉर्म देण्यात येईल त्यामध्ये आपल्या पंसतीच्या विकासकाचे नांव लिहून तो फॉर्म येथे लगेच जमा करावा. त्यामध्ये ज्याची संख्या जास्त भरेल त्या विकासकाला ७९ए च्या प्रोसेस करीता निवड झाल्याचे जाहीर करण्यात येईल.
सर्व सभासदांनी फॉर्म भरुन दिल्यानंतर त्यांची छाननी करण्यात आली. छाननी नुसार.
(१) Oakwoeds Corporation (Platinum Group) १२ सभासदांची पंसती
(२) Lal Gebi Infra Pvt Ltd (Gami Group) ११२ सभासदांची पसंती
मा. अध्यक्षांनी नमूद कले की, पुनर्विकासाबाबत आजपर्यंत झालेल्या कामाचा अहवाल सभेपुर्वी सभासदांना वितरीत करण्यात आला होता. त्या अहवालावर सर्व सभासदांनी आजपर्यंत झालेल्या कार्यावर समाधान व विश्वास व्यक्त केला आहे. वरील प्रमाणे गामी ग्रुपला जास्तीत जास्त सभासदांची पंसती मिळाल्याने बहुमताने सर्व सभासदानी Lal Gebi Infra Pvt Ltd (Gami Group) विकासकासमवेत जाण्यास पंसती दिल्याने संस्थेची ७९ए अन्वये विकासक निवडीची सभा लवकर आयोजित करुन त्यात बहुसंख्य सभासदानी पंसती दिलेल्या विकासकासमवेत जाण्याचे ठरले आहे.
सभेच्या उपस्थिती बाबत अपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने व सर्व सभासदानी उत्तम सहकार्य केल्याने आजची सभा चांगल्या प्रकारे पार पडली आहे. याबाबत मी सर्वांचे आभार मानतो आणि आजची सभा संपल्याचे जाहीर करतो असे अध्यक्ष यानी सभेला सांगितले त्यानुसार सभेचे कामकाज रात्री १०:३० वाजता संपल्याचे जाहिर केले.